भोपाळ ( वृत्तसंस्था) – भोपाळमधील विदिशा येथे राहणाऱ्या महिलेवर कौटुंबिक भांडणातून सासरच्यांने तलवारीने हल्ला केला. तासांच्या अथक परिश्रमानंतर भोपाळच्या नर्मदा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन केले, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती.
या हल्ल्यात महिलेच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली आहे.दोन्ही हातांच्या मनगटाजवळील रक्तवाहिन्या कापल्या गेल्या असून हाडही तुटले गेले. महिलेची प्रकृती गंभीर होत असल्याचे पाहून विदिशा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी महिलेला भोपाळला रेफर केले,
त्यानंतर महिलेला नर्मदा ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. रूग्णालयात ट्रॅमेंटोलॉजिस्ट आणि स्पाइन सर्जन डॉ. राजेश शर्मा आणि क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. रेणू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्लास्टिक सर्जन, व्हॅस्कुलर सर्जन, ऍनेस्थेसिया स्पेशलिस्ट, फिजिशियन, जनरल सर्जन यांच्या टीमने रूग्णाला तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेले.
सुमारे 8 ते 9 तास हे ऑपरेशन चालले, त्यानंतर महिलेच्या मनगटापासून लटकलेला हात वाचला, तसेच तिच्या चेहऱ्यावरील गंभीर जखमाही दुरुस्त करण्यात आल्या.
नर्मदा ट्रॉमा सेंटरचे संचालक राजेश शर्मा यांनी सांगितले की, महिलेला अत्यंत गंभीर अवस्थेत नर्मदा येथे आणण्यात आले होते. रुग्णावर तातडीने उपचार करून ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.
मनगटात रक्त वाहून नेणाऱ्या बारीक नसांचे बरेच नुकसान झाले होते, त्यामुळे प्लास्टिक सर्जन आणि आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने महिलेवर शस्त्रक्रिया केली, जी सुमारे 8 ते 9 तास चालली आणि अखेरीस महिलेच्या दोन्ही हातांना वाचवण्यात यश आले.