अखेर विवाहितेच्या पित्याची जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दूध फेडरेशन परिसरात एका अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अखेर विवाहितेच्या पित्याने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून पतीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून नसरीन वसीम पिंजारी (२८, रा. दूध फेडरेशनजवळ) ही विवाहिता शनिवारी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी व त्यांच्या पथकाने दुपारी रुग्णालयात जाऊन विवाहितेशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तसेच विवाहितेचे पिता व भाऊ यांना दिलासा दिला.
त्यानंतर विवाहितेचे पिता निसार पिंजारी यांच्या फिर्यादीवरून सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पती, सासू, नणंद यांना अटक केली आहे. फिर्यादित म्हटले आहे की, माहेरहून पैसे आणि धान्य आणावे यासाठी विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. शनिवार, ९ मार्च रोजी सासरच्या मंडळींनी विवाहितेला खाली ढकलून दिले. यात तिचे दोन्ही पाय, उजवा हात, छाती, पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यावरून पती वसीम छोटू पिंजारी, सासरा छोटू उमर पिंजारी, सासू हसीना छोटू पिंजारी, नणंद करिष्मा अकिल पिंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.