चाळीसगाव तालुक्यात हातगाव येथे घडली होती घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) : नाशिक येथे महापालिकेच्या सेवेत असलेल्या तरुणाने चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ४ एप्रिल रोजी घडली होती. याप्रकरणी मयत तरुणाच्या भावाच्या फिर्यादीवरून मयत तरुणाच्या सासरच्या ५ मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप भीमराव निकम (वय २८, रा. हातगाव ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याने दि. ४ एप्रिल रोजी राहत्या घरी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती.(केसीएन)संदीप निकम हा नाशिक येथे महापालिकेच्या सेवेत बससेवेमध्ये वाहक (कंडक्टर) म्हणून नोकरीस होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. दरम्यान संदीपचा भाऊ मिथुन भीमराव निकम (वय ३६) याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, संदीप निकम याने प्रेम विवाह केला म्हणून व त्याची पत्नी गौरी हिला भेटू न देण्याच्या कारणावरून संदीपच्या सासरच्या मंडळींनी त्याचा वेळोवेळी छळ केला.
प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाद्वारे मेसेज पाठवून संदीपला मानसिक त्रास दिला. त्यानंतर पत्नी गौरी हिने सुद्धा त्याच्यासोबत जायला व बोलण्यास नकार दिला. त्यामुळे सासरच्या मंडळींच्या मानसिक त्रासाला कंटाळून संदीप निकम याने दि. ४ एप्रिल रोजी आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.(केसीएन)याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला संशयित आरोपी संदीप भिवाजी पाळदे, मनीषा संदीप पाळदे, संकेत संदीप पाळदे, गौरी संदीप पाळदे, वैभव दाणी (सर्व रा. पाळदे मळा, बेलदगव्हाण, देवळाली कॅम्प ता. जि. नाशिक) यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल राजपूत करीत आहेत.