पारोळा (प्रतिनिधी) – नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे वळावे. तालुक्यात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे. यासाठी शहरातील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था व अध्यक्ष संजय पाटील यांनी अहिराणी गीतकार राजू साळुंखे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने लसीकरणाचा प्रत्येक ठिकाणी संदेश पोहचावा व जनजागृती व्हावी.यासाठी अहिराणी गीतातून संदेश दिला जात आहे.
कोरोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत आहे . मात्र नागरिक बेफिकीरपणे गर्दी करताना दिसत आहे. ग्रामीण भागासह शहरातदेखील अनेकांनी लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतला नसल्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
याकामी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंद्रकांत सूर्यवंशी व मुख्याधिकारी ज्योती भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल मीडियावर लसीकरण जनजागृती गीत नागरिकांना भावनिक आवाहन देत असून यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.
अनेक वर्षापासून सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व सचिव आशा पाटील क्षयरोग निर्मूलनासाठी सहकार्य करीत आहे.क्षयरोग निराकरणसोबत जास्तीत जास्त लोकांची लसीकरणाची भीती दूर व्हावी. हा हेतू ठेवत अहिराणी भाषेतून लोकांना समजेल अशा पद्धतीने गीत तयार करण्यात आले आहे.राजू साळुंके यांनी पहिला लाटेत जनजागृती व्हावी. यासाठी गीत तयार केले होते.