पुणे (प्रतिनिधी) – सर्वांसाठी खुशखबर आहे. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होत असून २३ ते २५ जून या कालावधीत कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मान्सूनची सुरुवात करणार आहे. लवकरच राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होत आहे.
पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ.कृष्णानंद होसाळीकर यांनी ही माहिती ट्विटरवर द्वारे दिली. त्यांनी सांगितले की, राज्यात २३ पासून मान्सून जोर धरणाच्या तयारीत आहे. २३ रोजी कोकण व विदर्भातून मान्सूनला सुरुवात होईल. त्यानंतर पुढील दिवसात मध्य महाराष्ट्र व मराठवाडयात तो बरसण्यास सुरुवात करेल. विजाच्या कडकडाटासह राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात होत आहे.
मान्सूनची दुसरी शाखा पश्चिम बंगाल व बिहारमधून उत्तर भारतात सक्रिय झाली आहे. तेथून तो हिमालयाच्या दिशेने निघाला आहे. एकदा त्याने हिमालय पार केला की, मान्सून स्थिर होऊन चांगला बरसण्यास सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मान्सून सध्या क्षीण झालेला असला तरी बुधवारी त्याने दक्षिण भारतात प्रगती केली. बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश भागात पाऊस सुरू झाला असून वाऱ्याचा वेग ५५ ते ६० किमी इतका वाढला आहे. उत्तर प्रदेशात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उत्तर भारतात मान्सून जोर धरत आहे. या दोन्ही वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.