पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील शेतात काम करीत असताना एका शेतकऱ्याला साप चावल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. २४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
रामा बळीराम ढमाले-पाटील (वय ४७, रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आई, पत्नी, २ मुले यांच्यासह गावात राहत होते. शेती काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. (केसीएन)शुक्रवारी दि. २४ जानेवारी रोजी रामा पाटील हे पत्नी व मुलासह शेतात कामाला गेलेले होते. तेव्हा अचानक त्यांना काहीतरी चावल्यासारखे जाणवले. त्यांनी तत्काळ पत्नीला कल्पना दिली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रामा पाटील यांना पाचोरा येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न सुरु असताना रस्त्यातच रामा पाटील यांची प्राणज्योत मालविल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)घटनेमुळे खेडगाव नंदीचे गावात शोककळा पसरली असून मितभाषी, मनमिळावू स्वभावाचे रामा पाटील यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे, पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.