लतिष जैन
चोपडा (प्रतिनिधी) – तालुक्यातील वैजापूर येथून जवळ असलेल्या पिंपरपाडा या आदिवासी पाड्यातील १६ वर्षीय मुलाला सापाने दंश केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी १८ रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी माहिती जाणून घेतली.
आदिवासी पाड्यांवरती आजही अनेक समस्यांना आदिवासी बांधवांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात, आता पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सापांचा धोका असतो. अशातच, वैजापूर गावाजवळ असणाऱ्या पिंपरपाडा येथील लखीराम सिताराम बारेला ( १६ ) या तरुणाला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. लखीराम ८ वीत शिकतो. सकाळी झोपेतून उठून लघुशंकेसाठी तो घराबाहेर गेला होता. तेव्हा त्याला अज्ञात विषारी सापाने दंश केला. त्याला कुटुंबीयांनी घरात आणले.
मात्र त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लखीराम हा हिंगणवाडे आश्रमशाळेत इयत्ता ८ वीत शिकत होता. त्याच्या पश्चात वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली असून चोपडा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली आहे.