भुसावळ पोलिसांचा यशस्वी तपास
भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील खडके एमआयडीसी परिसरात सरपंच पुत्र गिरीश तायडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणा-यास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे.भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ उप विभागीय अधिका-यांच्या विशेष पथकाने या कारवाईत सहभाग घेऊन यशस्वी तपास केला.
जितेंद्र भागवत खंडारे (रा. खडके ता. भुसावळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. ७ जून रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास खडके एमआयडीसी परिसरात सरपंच यशोधरा तायडे यांचे पुत्र गिरीष देविदास तायडे हे ड्रायव्हर आकाश सुरेश सपकाळे यांच्यासह गेले होते. गिरीष तायडे याच्यासोबत जितेंद्र खंडारे याचा वाद होता. त्यावेळी जितेंद्र खंडारे त्या ठिकाणी आला. जितेंद्र खंडारे याने धारदार हत्याराने गिरीष तायडे याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. गुन्हा घडल्यानंतर हल्लेखोर जिंतेंद्र खंडारे हा फरार झाला होता.
फरार जिंतेद्र खंडारे याच्या शोधकामी उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी विशेष पथकाची निर्मीती केली होती. या पथकात उप विभागीय कार्यालयातील पोहेकॉ सुरज पाटील यांच्यासह भुसावळ तालुका पोलिस स्टेशनमधील पोहेकॉ प्रेम सपकाळे, पोना दिपक जाधव यांचा समावेश करुन त्यांना योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. या पथकाने रात्रंदिवस परिश्रम घेत शिंदी, वरणगांव, वराडसिम, कानळदा, नांद्रा आदी परिसरात शोध मोहीम राबवली. मात्र जितेंद्र खंडारे मिळून येत नव्हता. त्यानंतर गुप्त माहितीनुसार खंडारे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे गेला असल्याचे समजले. त्यामुळे तपास पथक सिन्नर येथे रवाना झाले.
सिन्नर गावातील हॉटेल शाहू येथे जिंतेंद्र खंडारे हा येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्याठिकाणी सापळा लावण्यात आला. आलेला इसम खंडारे हाच असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार, सहायक फौजदार मोरे, पोहेकॉ संजय तायडे, पोहेकॉ विठठल फुसे, पोना पालवे आदी करत आहेत.