संविधानप्रेमी नागरिकांचा जळगावात भव्य मोर्चा
जळगाव (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर कोर्टात बुट फेकणाऱ्या अॅड. राकेश तिवारी याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज जळगाव शहरात संविधान प्रेमी नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध बहुजन समाज घटकांनी एकत्र येत तीव्र आंदोलन केले. हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संविधान, लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरचा थेट हल्ला असल्याचा दावा आंदोलकांनी केला.
जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा पायी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात बहुजन क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, परीट समाज, चर्मकार समाज, आंबेडकर समाज, मेहतर-वाल्मिकी समाज आदी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. रस्त्यांवर संविधान बचावाच्या घोषणा देत आणि राकेश तिवारीच्या विरोधात निषेध व्यक्त करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चादरम्यान राकेश तिवारीच्या प्रतिमेला पादत्राण्यांनी चोप देण्यात आला आणि त्याचा प्रतीकात्मक दहन करत संताप व्यक्त करण्यात आला.
मोर्चानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन सादर केले. निवेदनात राकेश तिवारीवर देशद्रोह, जातीय तेढ पसरविणे आणि न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा तात्काळ दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांच्या मते, या वकिलाचे कृत्य केवळ एका न्यायाधीशावरील वैयक्तिक हल्ला नसून, संपूर्ण दलित समाजाविरोधात असलेल्या खोल जातीय मानसिकतेचे प्रदर्शन आहे.
आंदोलनात मुकुंद सपकाळे, सुरेंद्र पाटील, डॉ. करीम सालार, सागर सबके, सुरेश चांगरे, शैलेश सोनवणे, जयसिंग वाघ यांच्यासह अनेक महिला आणि पुरुष नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी शांततेत, पण ठामपणे आपला विरोध नोंदवत प्रशासनाला चेतावणी दिली की, जर दोषीवर कारवाई झाली नाही, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.