पुणे ( प्रतिनिधी ) – सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य सरकारनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 7 हजार 168 पदांसाठी मागणीपत्र दिल्याची माहिती दिली आहे. एमपीएससीतर्फे विविध विभागातील पदांची भरती लवकरच केली जाईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
राज्य सरकारनं गट अ पदांसाठी 2 हजार 827 , गट ब साठी 2641 , गट क साठी 1700 जागा अशा एकूण 7 हजार 168 पदांच मागणीपत्र एमपीएससीला दिलं आहे. एमपीएससीला राज्य सरकारचं पत्र प्राप्त असून पुढील प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर कारणांमुळं भरती प्रक्रिया रखडली होती. आता 7 हजार 168 पदांसाठी मागणीपत्र दिल्यानं नोकरीसाठी परीक्षांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुवर्णसंधी असणार आहे.
राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आयोजित करता न आल्यानं वयोमर्यादा एका वर्षानं वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यासंदर्भातील परिपत्रक लवकरचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर केलं जाईल, असं देखील दत्तात्रय भरणे म्हणाले राज्य सरकारच्या निर्णयानंतर एमपीएससीकडून परिपत्रक जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.