आरोग्य विभागाचा नवीन जीआर
जळगाव (प्रतिनिधी) – सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपचार व तपासणी करण्यात येत आहे. मात्र रुग्णालयात असलेल्या रक्तपेढीतून रक्तपिशवी घ्यावयाची असेल तर त्यास नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे. याबाबत आरोग्य विभागाने बुधवारी २३ रोजी नवीन परिपत्रक जारी केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रत्येक रुग्णाला आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाव्या म्हणून १५ ऑगस्ट पासून मोफत उपचार, तपासणी सुरु करण्यात आले आहे. मात्र रक्तपेढीतून रक्त मोफत देण्याबाबत स्पष्टता नव्हती. तसेच, अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे सरकारी रुग्णालयात दाखल होऊन मोफत रक्त पिशवी घेऊन रक्त लावून झाल्यावर लगेच डिस्चार्ज घेत खाजगी रुग्णालयात दाखल होत होते, असे काहीसे चित्र सरकारी अधिकाऱ्यांना दिसून आले. त्यामुळे रक्तपेढीतील रक्तपिशवी खाजगी रक्तपेढीप्रमाणे आता नाममात्र शुल्क घेऊन रुग्णांना उपलब्ध केले जाणार आहे.
सदर मोफत उपचार बाबत दर्शनी भागात फलक लावणे, व्यापक प्रसिद्धी करणे याबाबत आरोग्य सेवांच्या आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहे.