शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पथक तळ ठोकून
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात नाशिक येथील टीडीएस विभागाचे अतिरिक्त आयुक्त विद्या रतन किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी दि. २१ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळीपर्यंत केलेल्या चौकशीत चिंचोली येथील मेडिकल हबच्या बांधकामाच्या व्यवहारातील टीडीएस संदर्भात चौकशी करण्यात आली. सरकारी निधीत ‘टीडीएस’ कपात न झाल्याचे दिसल्याने तपासणी करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या दालनात चौकशीला सुरुवात करण्यात आली. ही चौकशी सकाळी १० वाजेपासून सुरुवात करून रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती. चौकशीत चिंचोली येथील प्रस्तावित मेडिकल हबला एकूण १२०० कोटी मंजूर झाले आहे. मेडिकल हब बनविण्याचे काम केंद्राची सल्लागार समिती एचएससीसी कंपनी यांना दिलेली आहे. या सरकारी निधीत ‘टीडीएस’ कपात न झाल्याचे दिसल्याने ‘टीडीएस’ विभागाच्या ७ ते ८ अधिकाऱ्यांकडून याबाबत शासकीय नियमानुसार तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे चिंचोली येथील वैद्यकीय महाविद्यालय कार्यादेश खरेदी बीले, याच्याशी निगडित शासनाचा आलेला निधी व त्याचे नियमन याबाबत हि तपासणी असल्याचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.