रावेर तालुक्यात निंभोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील निंभोरा, सावदा, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर परिसरात शेती उपयोगी साहित्य, तोलकाट्यावरील बॅटरी-इन्व्हर्टर आणि मोटारसायकल तसेच कार चोरीच्या घटनांनी शेतकरी आणि व्यावसायिक हैराण झाले होते. अखेर निंभोरा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी केलेल्या अथक तपासानंतर तब्बल १२ लाख रुपयांच्या मुद्देमालासह चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी हरीदास बोचरे यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार, मागील १५ दिवसांपासून पोलिसांनी साखळी पद्धतीने नाकाबंदी, रात्रगस्त आणि तांत्रिक तपासणी सुरू केली होती. गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी विलास ऊर्फ काल्या सुपडु वाघोदे या संशयित आरोपीचा शोध घेतला. पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो फरार झाला, मात्र त्याच्या घरी त्याची सहकारी महिला योगिता कोळी सापडली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणारा मुख्य सूत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची आणि गोदामाची झडती घेतली असता, तेथे चोरीचा मोठा साठा सापडला.
या प्रकरणी चोरी करणारा मुख्य आरोपी विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे हा फरार असला तरी, पोलिसांनी योगिता सुनील कोळी, गोपाल संजय भोलनकर, आकाश मधुकर घोटकर, अर्जुन रतनसिंग सोळंकी, तसेच चोरीचा माल ठेवणाऱ्या जमील अब्दुल तडवी आणि विकत घेणाऱ्या स्वप्नील वासुदेव चौधरी, राकेश सुभान तडवी, ललित सुनील पाटील आणि राहुल ऊर्फ मयूर अनिल पाटील या १० आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून शेतीचे साहित्य, ५ टी.पी. पंप, ११ मोठ्या बॅटऱ्या, ३ लहान बॅटऱ्या, ७ इन्व्हर्टर, ४ मोटारसायकल, २ पॉवर ट्रॅक्टर, १ नॅनो कार, २ सोलार प्लेट, ११ मटेरियल बॅग आणि ३ ठिबक नळ्यांचे बंडल असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे निंभोरा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि सावदा पोलीस स्टेशनमधील एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे सपोनि हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली. यात उपनिरीक्षक दीपाली पाटील, ममता तडवी, पोहेकॉ सुरेश अढायंगे, बिजु जावरे, रिजवान पिंजारी, पोना अविनाश पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.