जळगाव एलसीबीची सिंधी कॉलनीत धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- गेल्या चार महिन्यांपासून फरार असलेला व सराईतपणे घरफोडी करणारा गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात सापडला आहे. जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून २७ जुलै २०२५ रोजी त्याला ताब्यात घेण्यात आले. मुस्तकीमने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण पाच घरफोड्यांची कबुली दिली आहे.
मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह (वय २४, रा. मशीदजवळ, शिरसोली प्र.न., जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. यापूर्वी, स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्यातील संशयित आरोपी सागर शिवराम डोईफोडे (वय २८, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याला १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला होता.(केसीएन)सागर डोईफोडेने अटकेदरम्यान मुस्तकीम उर्फ जुनेद भिकन शाह, रवी प्रकाश चव्हाण आणि नितीन चव्हाण (सर्व रा. तांबापुरा, जळगाव) यांच्यासोबत मिळून गुन्हे केल्याची कबुली दिली होती. तेव्हापासून पोलिस मुस्तकीमच्या शोधात होते, मात्र पोलिसांना चाहूल लागल्याने तो सुरतला पसार झाला होता.
दि. २७ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अकरम शेख आणि पोलिस शिपाई रवींद्र कापडणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुस्तकीम उर्फ जुनेद शाह जळगावात येणार आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी सिंधी कॉलनी परिसरात सापळा रचून मुस्तकीमला ताब्यात घेतले.(केसीएन) चौकशीदरम्यान, मुस्तकीमने रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणखी चार घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याला अटक करून २८ जुलै २०२५ रोजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहवा अकरम शेख, विजय पाटील, नितीन बावीस्कर, प्रवीण भालेराव, पोना किशोर पाटील, पोशि रवींद्र कापडणे आणि चापोशि महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.