धुळ्यातील चोरीप्रकरणी पोलिसांच्या तपासाला यश
धुळे (प्रतिनिधी) – शहरातील आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस या सोने-चांदीचे दुकानातून चोरट्यांनी १ कोटी १० लाखांचा ऐवज लांबवला होता. या गुन्ह्याची उकल आझादनगर पोलिसांनी केली असून दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. मुख्य आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीसह जबरी चोरीचे ३१ गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहेत. किशोरसिंग रामसिंग टाक (२५. गुरुगोविंद नगर, शिवाजीनगर जवळ, जालना) व झनसिंग ऊर्फ लकी जीवनसिंग जुनी, (२८, नवनाथ मंदिराजवळ, हरिविठ्ठल नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर आणखी एक संशयित जळगावातील साथीदार पसार झाला आहे.
अटकेतील आरोपींकडून ६० हजार रुपये किमतीची एक किलो २० ग्रॅम चांदीच्या पट्टी स्वरूपात पाच लगड व ७२ हजार रुपये किमतीचे १४.४३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या तीन लगड तसेच ४० हजार रुपये किमतीची दुचाकी मिळून एक लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान, संशयितांचा एक कुविख्यात साथीदार पसार असून त्याच्याकडे गुन्ह्यातील मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल असल्याची माहिती दिली. आरोपी किशोरसिंग रामसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकूण ३१ घरफोडीजबरी चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगीरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, हवालदार योगेश शिरसाठ, पोलीस नाईक योगेश शिंदे, संदीप कढरे, अविनाश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अझहर शेख, सचिन जगताप, नीलेश पाकड, पंकज जोंधळे, सिध्दार्थ मोरे, महिला पोलीस शिपाई पवार आदींच्या पथकाने केली.