नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त गलवानमध्ये आपल्या वीरतेचे प्रदर्शन केलेल्या कर्नल संतोष कुमार यांना ‘महावीर चक्र’ या देशाचा दुसऱ्या सर्वोच्च वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. चीन सोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे.
कर्नल संतोष कुमार यांच्या सोबत गलवान खोऱ्यात राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ च्या दरम्यान चीनी सैनिकांशी झालेल्या झटापटीवेळी शहीद झालेल्या इतर पाच सैनिकांनाही वीर चक्राने सन्मानित करण्यात येत आहे. युद्धाच्या वेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सैनिकांना हे वीर पुरस्कार देण्यात येतात.लष्कराने जाहीर केलेल्या प्रशस्तीपत्रकानुसार, “15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात ऑपरेशन स्नो लेपर्डच्या दरम्यान बिहार रेजिमेन्टचे (16 बिहार) कर्नल बिकुमाला संतोष बाबू यांना कमांडिंग ऑफिसर म्हणून नेमण्यात आले होते. शत्रू सैनिकांच्या हिंसक आणि आक्रमक कारवाईला विरोध करताना ते जखमी झाले. तरीही आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या शौर्याचं प्रदर्शन केलं.”