जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतून मी माघार घेणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही . मी निवडणूक लढवणार आहे , असे आमदार संजय सावकारे यांनी केसरीराज सोबत बोलताना सांगितले.
आमदार संजय सावकारे म्हणाले की , मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही . काही लोक खोडसाळपणाने अशा वावड्या उठवत असतील तरी त्या निरर्थक आहेत. भुसावळ तालुका सोसायटी मतदारसंघात जिल्हा बँकेचे २५ अधिकृत मतदार आहेत एका मतदाराचा मतदानाच्या अधिकाराचा वाद प्रशासनाकडे सुरु आहे . तालुक्यातील काही लोकांना मला सरळ विरोध करणे शक्य होत नसल्याने व माझ्या विरोधात मतदारांपुढे प्रभावी बाजू मांडणे शक्य होत नसल्याचे दिसत असल्याने ते लोक अशा निरर्थक चर्चेला खतपाणी घालत असले तरी नेमक्या मतदारांना सगळी वस्तुस्थिती माहिती आहे आणि समजतेही आहे. मी माझ्या मतदारांच्या संपर्कात राहून सगळी काळजी घेत आहे , अशी माहितीही भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी केसरीराज सोबत बोलताना दिली.