भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आता डॉ. भोयर यांचेकडे
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले तसेच राज्याचे कॅबिनेट वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. आता त्यांचे पालकमंत्रीपद काढून त्यांना शेजारील बुलढाणा जिल्ह्याचे सह पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर भंडाऱ्याला पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री तथा वर्धा येथील डॉ. पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले त्या वेळेला जळगाव जिल्ह्यातील तिघांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली होती. यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांचेसह भाजपकडून गिरीश महाजन तसेच संजय सावकारे यांचीही वर्णी लागली होती.(केजीएन)मुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटील यांची जळगाव तर संजय सावकारे यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती केली होती.
तेव्हापासून संजय सावकारे हे भंडारा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून काम पाहत होते. आता सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने सुधारित आदेश काढला आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे काम पाहतील असे म्हटले आहे. तर संजय सावकारे हे बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून काम पाहतील. सध्या बुलढाणा येथे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा वाई जि. सातारा येथील आ. मकरंद पाटील हे काम पाहत आहेत.