मुंबई ( प्रतिनिधी ) – शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या घरी जाऊन भेट घेतली. संजय राऊत यांनी राज यांना कन्येच्या लग्नाची पत्रिका दिली. कौटुंबीक सोहळ्याच्या निमित्ताने राऊत यांनी राज यांची भेट घेतली असली तरी या भेटीमुळे पुन्हा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन होता. त्यामुळे संजय राऊत आज शिवतीर्थावर सपत्नीक आले होते. शिवसेना प्रमुखांना अभिवादन केल्यानंतर राऊत यांनी थेट राज ठाकरे यांचं नवं घर गाठलं. राऊत यांच्या मुलीचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राऊत सपत्नीक राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते. यावेळी राज आणि राऊत यांच्यात मनमोकळ्या गप्पा झाल्या. ही कौटुंबीक भेट होती. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जातं. मात्र, तरीही या भेटीने तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
राऊत आणि त्यांची पत्नी जायला निघाले. तेव्हा राज ठाकरे, शालिनी ठाकरे आणि अमित ठाकरे हे गेटपर्यंत त्यांना सोडायला आले. राऊत यांनी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना कन्येच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शरद पवारांसह संपूर्ण कुटुंबाला मुलीच्या लग्नाचं निमंत्रण देत लग्नाची पत्रिका दिली. राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेऊन त्यांना कन्येच्या लग्नाचं निमंत्रण दिलं.
राऊत यांच्या कन्येचं 29 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा विवाह होणार आहे. राऊत यांचे व्याही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे अत्यंत अभ्यासू, मितभाषी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी समजले जातात. राऊत हे पॉवरफूल राजकारणी असले तरी त्यांचे व्याही नार्वेकरही धडाडीचे अधिकारी आहेत. नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. त्यांचा स्वतंत्र व्यवसाय आहे पूर्वशी राऊत उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. सायन इथे त्यांचं ऑफिस आहे.