नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – 102व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार आणि बंदुका घेऊन लढत आलो आहोत. तागडी आणि तराजू कधीच आमच्या हातात आलं नाही, असं सांगतानाच आम्ही सामाजिक न्यायाची आस घेऊन आलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
आज संसदेत घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभाग घेताना संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग केली. तुम्ही आणलेलं बिल अर्धवट आहे. जोपर्यंत 50 टक्क्यांची मर्यादा हटवली जात नाही. तोपर्यंत फायदा नाही. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही 30 वर्षांपासूनची आहे. त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. तुम्ही ही मर्यादा वाढवली पाहिजे. तुम्ही आता दुरुस्ती कराल, काही बदल कराल, त्याने काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला 50 टक्क्यांची मर्यादा हटवलीच पाहिजे, असं राऊत म्हणाले.
खासगदार संभाजी छत्रपती या सभागृहात बसले आहेत. ते या आंदोलनाचे सर्वात मोठे नेते होते. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावर जावी ही त्यांचीही भावना, त्यामुळे सरकारने सर्वांच्याच भावानांचा आदर करून निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.