मुंबई (वृत्तसंस्था) – राजकारण वेगळी गोष्ट आहे. मात्र महाराष्ट्राचे मुख्यंमत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आजही उत्तम संबंध असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राउत यांनी म्हटले आहे. 8 जून रोजी उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी 40 मिनिटे स्वतंत्र चर्चा केली होती. त्यानंतर आता राउत यांनी एका वाहिनीशी बोलताना हा खुलासा केला आहे.
ते म्हणाले की, चाळीस मिनिटांच्या या भेटीनंतर राज्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा एकत्र येतील असा अंदाज बांधणे चुकीचे आहे. आमचे मार्ग वेगवेगळे आहेत. मात्र ठाकरे कुटुंब आणि पंतप्रधान मोदी यांचे आजही चांगले संबंध आहेत. राजकारण वेगळे असले तरी व्यक्तीगत संबंध उत्तम आहेत. शरद पवार यांचेच पाहा. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आम्ही संबंध जपण्याला महत्व देतो.
राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये तीन पक्ष असले तरी आमचे कमिटमेंट आहे. हे सरकार पाच वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करेल. आम्ही स्वबळावर लढू या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाबाबबत विचारले असता राउत म्हणाले की निवडणुका एकत्र लढण्याबाबत आमचे काही कमिटमेंट झालेले नाही. सरकार चालवण्याबाबत ते आहे. तीन वर्षांनंतर बघू कोण कशाच्या भरवशावर निवडणुका लढवतो ते. सरकार चालले आहे. चालेल. निवडणुका आल्यावर पुढचे बघू.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा असे त्यांना सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यावर त्यांच्याशी बोलणी केली आहे.भाजप आज विरोधात आहे. मात्र काही नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यात राजकारण कुठे आहे?
कॉंग्रेसबाबत बोलताना राउत म्हणाले की, कॉंग्रेस आज कमकुवत असली तरी कॉंग्रेसशिवाय मजबुत आघाडी होऊ शकत नाही. मात्र त्यांना सोबत घेउनच आम्हाला पुढे जावे लागणार आहे. मजबुत पर्याय उभा करावा लागणार आहे. नेतृत्व कोण करणार हा मुद्दा जेव्हा येतो तेव्हाच गडबड होते. त्याबाबत कॉंग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली पाहिजे.