ललितकुमार घोगले आणि सुरेश पवार यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ चे उमेदवार ललितकुमार घोगले आणि १२ ‘ड’ चे उमेदवार सुरेश पोपट पवार यांच्या प्रचारार्थ रविवारी, ११ जानेवारी रोजी समतानगर परिसरात भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला मतदारांचा, विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सकाळी १० वाजता सुरू झालेली ही प्रचार फेरी समतानगरमधील प्रमुख गल्ल्यांमधून फिरली. यावेळी ठिकठिकाणी उमेदवारांचे जंगी स्वागत करण्यात आले. महिलांनी घराबाहेर येऊन उमेदवारांना पेढे भरवले आणि त्यांचे औक्षण करून विजयाचा टिळा लावला. ज्येष्ठ नागरिकांनी “विजयाचे हार” घालून उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिले. फुलांची उधळण आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता.

यावेळी ललितकुमार घोगले आणि सुरेश पवार यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. परिसरातील विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यकर्त्यांच्या हातात असलेले पक्षाचे झेंडे आणि समर्थकांचा मोठा ताफा यामुळे या प्रचार फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या प्रचार फेरीत राहुल सुरवाडे, भीमराव पवार, केतन पवार, जिगर अहिरे, प्रशांत सुर्यवशी, सुमित परदेशी अंकित मौर्य, अतुल पवार, सागर केदार, गजानन पाटील, प्रसाद महाजन, आरती घोगले, प्रेमा पेशट्टीवार, पवन घुसाळ, रफिक पिंजारी, मीना जाधव, गणेश जाधव, उमेश वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महिलांचा वाढता सहभाग पाहता, या प्रभागात घोगले आणि पवार यांचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत आहे.









