शहरातील समता नगर भागातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील समता नगर येथे आज दुपारी जुन्या वादातून एका तरुणाचा चॉपरने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे. घटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) ने संशयीतांना निष्पन्न केले असून त्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत.
अरुण बळीराम सोनवणे (वय-२८, रा. समता नगर जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे आणि आशिष संजय सोनवणे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. समता नगर परिसरात जुन्या वादातून आज सकाळी काही तरुणांसोबत अरुण याचा वाद झाला होता. त्यामुळे हा वाद काहींच्या मदतीने मिटवण्यात आला होता. परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा हा वाद उफाळून आल्याने काही संशयितांनी मयत अरुण बळीराम सोनवणे याला समता नगरातील वंजारी टेकडी येथे एकट्याला बोलवले.
दरम्यान अरुण सोनवणे हा टेकडीवर गेल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मोठा भाऊ गोकुळ सोनवणे हा देखील तिथे धावत गेला. तोवर इतर मारेकऱ्यांनी त्याच्यावर चॉपर व कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये अरुण सोनवणे यांच्या गळ्यावर, छातीवर पाठीवर, मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. तर सोबत असलेले आशिष संजय सोनवणे आणि गोकुळ बळीराम सोनवणे हे गंभीरित्या जखमी झाले.
घटना घडल्यानंतर तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी अरुण सोनवणे याला मयत घोषित करण्यात आले. यावेळी शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची व मित्रपरिवाराची प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर समतानगर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे.
दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) च्या पथकाने माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात धावं घेतली. त्या ठिकाणी माहिती जाणून घेत संशयितांची नावे निष्पन्न केली. संशयित आरोपींना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी काही पथके रवाना केली आहेत. रात्रीपर्यंत संशयित यांना अटक होईल अशी माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक नजन पाटील यांनी “केसरीराज” शी बोलताना दिली.