महामंडळाकडून सुमारे १५ टक्के रक्कम वाढली
मुंबई (वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळच्या एसटी बसेससह टॅक्सी, आणि रिक्षाच्या प्रवास भाड्यात लक्षणीय वाढ जाहीर करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. एसटी महामंडळाने सुमारे १५ टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी दिली असून, हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयामध्ये इंधनाचे वाढलेले दर, कर्मचाऱ्यांचे पगार आणि सुटे भागांच्या किमतींच्या वाढीचा संदर्भ दिला आहे. या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. दुसरीकडे, एसटीच्या दरवाढीनंतर मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनीही १ फेब्रुवारीपासून भाडेवाढ लागू करण्याची मागणी केली आहे. नवीन भाडेवाढीनुसार, रिक्षा भाडे किमान २३ रुपयांवरून २६ रुपये, टॅक्सी भाडे किमान २८ रुपयांवरून ३१ रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना खर्चाची तोशिष लागणार आहे. या सर्व भाडेवाढीचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. एसटी तसेच टॅक्सी आणि रिक्षा या सार्वजनिक वाहतुकीच्या मुख्य साधनांमुळे लाखो नागरिकांना अधिक खर्च करावा लागेल.