जळगाव ( प्रतिनिधी ) – पडसोद गावातील सामाईक शेतीच्या वादातून भावांमध्ये वाद वाढत जाऊन मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी घडलेल्या या प्रकारात एका व्यक्तीला काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले असून, तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पडसोद येथील मूळ रहिवासी ताराचंद मंगल सोनवणे (वय ५०), सध्या नाशिक येथे वास्तव्यास, हे आपल्या सामाईक जमिनीबाबत मोठे भाऊ हिरामण मंगल सोनवणे यांच्यासोबत सुरू असलेल्या वादासाठी गावात आले होते. गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेतीजवळ पुन्हा वाद निर्माण झाला. या वादातून रागाच्या भरात हिरामण सोनवणे, सुनंदाबाई हिरामण सोनवणे आणि बेबाबाई प्रल्हाद बाविस्कर यांनी ताराचंद यांच्याशी शिवीगाळ करत काठीने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मारहाणीमध्ये ताराचंद सोनवणे यांना दुखापत झाली असून, आरोपितांनी त्यांना जिवे मारण्याची धमकीदेखील दिल्याचे सांगितले जाते. घटनेनंतर त्यांनी तात्काळ जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि धमकीचे गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.









