अमळनेर तालुक्यात घटना
अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यात एका विवाहितेने आरोपीविरुद्ध असलेल्या जुन्या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या रागातून तिचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला ही १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास पातोंडा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सार्वजनिक जागेवर असताना ही घटना घडली. संशयित आरोपी अरुण दौलत संदानशिव याने पीडितेच्या जवळ जाऊन “तू माझ्या विरुद्ध दाखल असलेल्या केसमध्ये साक्षीदार का झाली?” असे म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आरोपीने पीडितेच्या डाव्या खांद्याला धक्का देऊन तिचा हात पकडला आणि स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
केवळ विनयभंग करूनच आरोपी थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या पतीला, जेठाला आणि जेठाणीला “बंदुकीच्या गोळीने संपवून टाकेन” अशी जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पीडितेने तात्काळ अमळनेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. अमळनेर पोलिसांनी आरोपी अरुण संदानशिव याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भोई हे करत आहेत. सध्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस अधिक तपास करत आहेत.









