प.पू. उमरावकुॅंवरजी ‘अर्चना’ म.सा.यांचे प्रतिपादन
महापुरुष हे त्यांच्या गुणांमुळे मोठे होतात, ते नंतरच्या पिढ्यांसाठी त्यांच्या गुणांचा ठेवा मागे ठेऊन जातात. याच कारणामुळे महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करण्याचे मुख्य उद्दिष्ट असते. या महापुरुषांचा एक गुण जरी अंगिकारला तरी जन्माचे सार्थक होऊ शकेल. पूज्य अर्चनाजी यांच्या जन्मजयंतीच्या निमित्ताने आजच्या ‘संकल्प दिनी’ त्यांची म्हणजे राजगुरूमाता काश्मीर प्रचारिका महासती प.पू. उमरावकुॅंवरजी ‘अर्चना’ म.सा. यांची प्रकर्षाने आठवण होत आहे. त्यादेखील दृढ निश्चयी, दृढ संकल्प करणाऱ्या होत्या. त्यांच्या या गुणांचा गौरव करताना, ‘संकल्प दृढ असेल तरच हमखास यश प्राप्ती होते’ हा महत्वाचा संदेश संयम स्वर्ण साधिका, श्रमणीसूर्या, राजस्थान प्रवर्तिनी प.पू. डॉ. सुप्रभाजी म.सा. यांनी आजच्या प्रवचनात दिला.
विषयाचा हाच धागा घेऊन स्पष्ट करताना प.पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी देखील आजच्या प्रवचन सभेत प्रसंगोचित विचार श्रावक-श्राविकांसमोर मांडला. जड व चैतन्य शक्तीचे प्रकार असतात परंतु दृढ संकल्प जिवंत व्यक्ती किंवा चैतन्यशक्तीमध्येच असतो. तसेच संकल्प प्रशस्त म्हणजे कल्याणकारी आणि अप्रशस्त अशा दोन प्रकारचे असतात हे सांगून समुद्रपाल व पुंडरीकराजा व त्याच्या लहान भावाची प्रेरक कथा सांगितली. आपल्या दृढ संकल्पामुळे कोणते लाभ होतात व संकल्पापासून दूर गेल्याने काय नुकसान होते हे समजावून सांगितले. हा विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी भांडखोर पत्नी व निश्चयाने न ढळणारा, दृढ संकल्प असलेल्या पतीची काल्पनिक गोष्ट सांगितली. गुरुंकडून भोपळा न खाण्याचा संकल्प, प्रत्याख्यान तो घेतो. परंतु हा संकल्प पूर्ण होऊ न देण्याचा त्याच्या पत्नीचे अनेक प्रयत्न होतात.
संकल्प टिकून रहावा यासाठी तो जंगलात निघून जातो. त्याला झोप लागते. मध्यरात्री नंतर चोर त्या ठिकाणी येतात. ‘मी खाणार.. मी खाणार…’ असे काहीसे बडबडत असतो. चोर घाबरून चोरलेले साहित्य तेथेच सोडून पळून जातात. त्या गडबडीत तो जागा होतो. चोर घाबरून पळालेले पाहून हा ते सर्व गोळाकरून आपल्या घरी पोहोचतो. त्याने दृढ संकल्प केल्याने त्याला घबाड प्राप्त होते. आजच्या पिढीमध्ये संकल्पाचा अभाव असल्याने नकारात्मक, निराशा, ताण-तणाव आणि डिप्रेशन इत्यादी दिसते. या सर्वांवर मात करण्यासाठी व यश मिळविण्यासाठी मनात दृढ संकल्प ठेवावा असे सांगण्यात आले. १५ व १६ ऑगस्ट रोजी सकाळचे प्रवचन आणि नियोजित कार्यक्रम जैन हिल्स, शिरसोली रोड, जळगाव येथे होणार असल्याच्या सूचना प्रवचनात देण्यात आल्या.