जळगाव ;- भुसावळातील व्यक्तीच्या दुचाकीस लाथ मारून खाली पाडत तिघांनी मारहाण करीत सोन्याची चेन, मोबाइल व दहा हजार रुपयांची रोकड असा २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला हाेता. या गुन्ह्यातील मुख्य संशयितास बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक केली.
आदर्श उर्फ डफली बाळू तायडे (वय २३, रा. न्यू आंबेडकरनगर भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
डफली याने दोन साथीदारांच्या मदतीने १९ एप्रिल रोजी साकेगाव (ता. भुसावळ) येथे राहणाऱ्या विनोद बजरंग परदेशी (वय ५१, साकेगाव) यांच्या धावत्या दुचाकीस लाथ मारून त्यांना खाली पाडले. यानंतर त्यांना मारहाण केली. ही घटना साकेगाव येथील फार्मसी कॉलेजच्या मागे घडली होती. या दरोडेखोरांनी परदेशी यांच्या दोन सोन्याच्या चेन, मोबाइल व दहा हजार रुपये रोख असा २ लाख ८५ हजार रुपयांचा एेवज लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही संशयित दुचाकीने बेपत्ता झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनीय माहिती मिळाल्यानुसार यातील एक संशयित हा डफली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा तपास काढून त्याला अटक करण्यात अाली.
डफली हा यावल येथील नातेवाइकाकडे गेल्याची माहिती मिळाली. पथक यावल येथे पोहाेचल्यानंतर त्याने तेथूनही पलायन केल्याची माहिती समोर आली. यानंतर पथक डफलीच्या मूळ गावी म्हणजेच बोरसल येथे पोहाचेले. या वेळी डफली हा घरातच मिळून आला. त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी घरात लपवून ठेवलेली होती. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याला पुढील तपासासाठी भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.








