जळगाव-धुळ्यातील अनेक तालुक्यांमध्ये गारवा
जळगाव (प्रतिनिधी) : हवामान खात्याकडून राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी दि. २९ मार्च रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होऊन जळगाव जिल्ह्यासह धुळ्यातील काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे काढणीला आलेल्या गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अनेक दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट आली आहे. तापमानाचा पारा ४२ अंशाच्या वर पोहचला आहे. दरम्यान उन्हाचे चटके अधिक तीव्र होत असताना शुक्रवारी दि. २९ रोजी जळगाव शहर, तालुका तसेच काही तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार धुळे व जळगाव जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यात सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यान विजाच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी काढणीला आले आहेत. अनेक शेतकरी गहू काढणीच्या तयारीत आहेत. तर काहींनी हरभरा कापून ठेवला आहे. आजच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे काहीसे नुकसान झाल्याची भीती निर्माण झाली असून शेतकरी चिंतेत सापडला आहे.