जळगाव शहरातील ज्ञानदेव नगरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : नव्याने बांधल्या जाणाऱ्या अपार्टमेंटमध्ये वायरिंगचे काम सुरु होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करुन तेथून ३ लाख १२ हजार रुपये किंमतीचे वायरचे बंडल चोरुन नेले. ही घटना दि. २९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानदेव नगराजवळील प्रेमचंद नगर परिसरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील जोशीपेठेत राहणाऱ्या धैर्यशील जगतराव चौधरी हे बांधकाम व्यावसायीक आहेत. त्यांची जूनाखेडी रोड परिसरातील प्रेमचंद नगरात अपार्टमेंटचे काम सुरु आहेत. अपार्टमेंटच्या बांधकामाचे काम पुर्ण झाले असून इलेक्ट्रीक वायरिंगचे काम केले जात आहे. त्यासाठी चौधरी यांनी इलेक्ट्रीक साहित्य खरेदी केले होते. दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेनंतर चोरट्यांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करुन अपार्टमेंटमध्ये वायरिंग केलेल्या वायरसह इतर वायरचे बंडल असा एकूण ३ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
तसेच चोरट्यांनी पीव्हीसी पाईप व पीओपीचे नुकसान देखील केले. ही घटना दि. ३० ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर धैर्यशील चौधरी यांनी शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल साळुंखे हे करीत आहेत.









