मृत्यू हे सत्य प्रत्येकाला माहित आहे. शरिरासह सर्वच आपण येथेच सोडून जाणार आहे हेही माहित आहे तरिसुद्धा जीवनभर गोळा करत राहणे, संग्रह करणे यातच मनुष्य वेळ घालवितो. संग्रह करुन घराचे संग्राहलय करुन ठेवतो. धन, पैसा जगण्यासाठी किती लागतो याचे माप असले पाहिजे. कुठलीही गोष्ट, पदार्थ आपले इंद्रिय सेवन करताना त्याला मर्यादा असतात. ज्याप्रमाणे भोजन करताना अन्नाचे माप, अंगावरील कपड्यांचे माप असते त्याप्रमाणे आवश्यक, गरज आहे तेवढेच आपल्याजवळ ठेवा आणि बाकी चांगल्या कामात लावा. पुण्यप्रभावाने आपल्याकडे ज्या गोष्टी, पदार्थ, वस्तु येतात त्याचा संग्रह केला तर पाप वाढत जाते. त्यामुळे सुयोग्य उपभोग करत असतानाच दुसऱ्यांच्या कामी आले पाहिजे. आधुनिकरणाच्या नावाखाली कुटुंब लहान आणि घर मोठे झाले त्यात टिव्ही, फ्रिज यासह अन्य भौतिक वस्तु वाढल्या मात्र त्याचा उपभोग घेणारे मात्र कमी झाले, ही वस्तुस्थिती समजून संग्राहक न होता संग्रह सोडणारे ग्राहक व्हा आणि संग्रह करण्याची वृत्ती सोडा! असे विचार आज धर्मसभेत शासनदीपक प.पु. सुमितमुनिजी महाराज यांनी श्रावक-श्राविकांसमोर मांडले.
अनुशासन आणि आत्मानुशासन यातील फरक मनुष्याला यशस्वी होण्याचा मार्ग दाखवितो. दुसऱ्यांकडून लादलेली सक्ती म्हणजे अनुशासन ते दिर्घकाळ राहत नाही. मात्र स्वत:च्या ईच्छेने स्वत:साठी केलेल्या नियमांचे पालन म्हणजे आत्मानुशासन होय. आपल्यातील शक्ती ओळखून वेळेचा सदुपयोग करा, मोबाईल, टिव्ही, स्क्रिन टाईममध्ये वाया जाणारी शक्ती विधायक कामांमध्ये लावा. अनु म्हणजे शक्ती आणि शासन म्हणजे अधिकार याचे चिंतन करा आणि तसे आचरण करा असे विचार आरंभी परमपूज्य प.पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म.सा. यांनी मांडले.