सर्वस्तरातून अभिनंदन
भुसावळ ( प्रतिनिधी ) – कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आणि आपल्या सुमधुर आवाजाने अवघ्या देशाला भुरळ घालणारे जळगावचे सुप्रसिद्ध गायक संघपाल राजाराम तायडे यांना यंदाचा मानाचा ‘उत्कर्ष कलाविष्कार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. उत्कर्ष कलाविष्कार संस्था, भुसावळ आणि ओबेनॉल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘खानदेश नाट्य महोत्सव २०२६’ च्या दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान सोहळा पार पडला.

महाराष्ट्र राज्याचे खादी उद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना ना. सावकारे यांनी संघपाल तायडे यांचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “संघपाल यांच्या गायनाचे व्हिडिओ मला मंत्रालय आणि परराज्यातूनही लोक पाठवून कौतुक करायचे. जळगावचा पोलीस किती सुरेल गातो, हे पाहून मलाही अभिमान वाटायचा. आज प्रत्यक्ष त्यांना सन्मानित करताना अतिशय आनंद होत आहे.”
पुरस्कार स्वीकारताना संघपाल तायडे भावूक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “आजवर अनेक पुरस्कार मिळाले, पण खानदेशच्या मातीतील हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत खास आहे. या पुरस्कारामुळे खांद्यावरील जबाबदारी अधिक वाढली असून, आगामी काळात पोलीस दल आणि कलाक्षेत्रात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
या सोहळ्याला कला, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उत्कर्ष कलाविष्कार संस्थेने या वर्षापासून सुरू केलेल्या या पुरस्काराचे सर्वत्र स्वागत होत आहे.







