साडेसात लाखांच्या चोरीच्या १६ दुचाकी जप्त, चौघांना अटक
जिल्ह्याबाहेर केल्या होत्या चोऱ्या ; एलसीबीची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून चोरीच्या दुचाकी आणून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीतील चार जणांना दोन पथकाने एरंडोल, पाचोरा तालुक्यातून बुधवारी ३० ऑगस्ट रोजी दुपारी अटक केली. चोरट्यांकडून चोरीच्या ७ लाख ६० हजार रुपयांच्या १६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
जळगाव शहरात विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पथकाला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गोपनीय माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील पिंप्रीसिम येथील सुनील भिल यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केले असता त्याने इतर चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या.
त्यानंतर ह्या दुचाकी एरंडोल तालुक्यातील नांगदुली या गावातील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्याकडून विना कागदपत्राच्या आधारे कमी किमतीत विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने खुशाल पाटील आणि गोविंदा कोळी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अजून ९ मोटरसायकल हस्तगत केल्या, त्यानंतर सुनील भिल याची अजून चौकशी केली असता तपासात पाचोरा तालुक्यातील हर्षल पाटील (राजपूत) यांच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी हस्तगत केल्या. दरम्यान या सर्व दुचाकी संतोष इंगोले रा. अकोला याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरून या चौघांकडे विल्हेवाट लावण्याचे काम दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली. चौघांकडून ७ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी हस्तगत केले आहे.
याप्रकरणी सुनिल शामराव भिल (वय-३५) रा. पिंप्री सिम ता. एरंडोल, खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील (वय-२०), गोविंदा अभिमन्य कोळी (वय-४५) दोन्ही रा. नागदुली ता.एरंडोल आणि हर्षल विनोद कोळी (वय-२०) रा. मोहाडी ता. पाचोरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ दुचाकी जामनेर तालुक्यातील आहे. बुलढाणा, गुजरात, अकोला, अहमदनगर येथील काही दुचाकी असल्याची माहिती मिळाली आहे.
सपोनि निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागुल, संदीप सावळे, प्रीतम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल उमेश गोसावी, लोकेश माळी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल प्रमुख ठाकूर, मोतीलाल चौधरी या पथकाने कारवाई केली.