जयपूर ;- राजस्थानमध्ये काँग्रेसअंतर्गत सुरु असलेलं राजकारण नव्या वळणावर असलेलं पहायला मिळतंय. भाजपच्या वाटेवर असलेल्या सचिन पायलट यांनी आता आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. एबीपी न्यूजचे प्रतिनिधी आदेश रावल यांनी रात्री उशिरा सचिन पायलट यांच्याशी फोनवरुन बातचित केली, यावेळी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी त्यांना सांगितल्याचं एबीपी न्यूजने म्हटलं आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज आहेत. आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र अजून त्यांनी यासंदर्भातील भूमिका जाहीर केलेली नाही.
दरम्यान, राजस्थान काँग्रेसने आज आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे, या बैठकीला हजर राहणार नसल्याचं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहेत. सचिन पायलट यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.