जळगाव (प्रतिनिधी) – अभियांत्रिकीतील विविध पैलूंचा अभ्यास करत जगातील कुठल्याही समस्यांवर शाश्वत पर्याय व मार्ग काढून ते टिकावं यासाठी “केसेस इन एप्लीकेशन सस्टेनेबल इंजीनियरिंग सॉल्यूशन” या विषयावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, इंडियन वाॅटर वर्क्स असोसीएशन, इन्स्टिट्यूटशन इनोव्हेशन कॉन्सिल तसेच मॅकेनिकल अभियांत्रिकी विभाग, सिव्हील अभियांत्रिकी विभाग, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभाग व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजी इन्स्टिट्यूटमधील प्रा. हरीश चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी नमूद केले कि प्रत्येक क्षेत्रात विविध समस्या आहेत पण त्यावरील उपाय हे अभियांत्रिकी क्षेत्रातील लोकांनी शोधले तर त्या समस्यावर जुगाडनीती न वापरता त्याचे शास्त्रीय पद्धतीने व निरंतर असे शाश्वत उपाय हे अभियंते योग्य पद्धतीने शोधू शकतात तसेच “सबका साथ – शाश्वत विकास” हा मंत्र त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. यावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंटचे विभागप्रमुख प्रा. सौरभ गुप्ता, विद्युत विभागप्रमुख प्रा. बिपासा पात्रा उपस्थित होते. याखेरीज प्रा. सौरभ गुप्ता यांनी, सदर परिषदेच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की ही एक उदयोन्मुख तांत्रिक परिषद आहे आणि ऊर्जा रूपांतरण उपाय आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाची आहे. या परिषदेमध्ये भारतातील एकूण १०८ शोधप्रबंध प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले यानंतर या परिषदेत उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शोधप्रबंध पुस्तिका प्रदर्शित करण्यात आली. तसेच यावेळी मार्गदर्शन करतांना रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी ही परिषद शास्त्रज्ञ, संशोधक, औद्योगिक अभियंते आणि इस्टीट्युटमधील विद्यार्थ्यांना त्यांची संशोधन कामगिरी सादर करण्यासाठी आणि उर्जा क्षेत्रातील तज्ञांसह नवीन सहयोग आणि भागीदारी विकसित करण्यासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करेल असे सांगितले. तसेच त्यांनी सद्यस्थितीत ऊर्जा निर्मिती व वापरामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे तरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल करून भविष्यात योग्य प्रकारे ऊर्जेचा वापर करता येऊ शकतो असे नमूद केले. तसेच त्यांनी ग्लोबल वार्मिंग समस्यांबाबत बाबत आपण लक्ष दिले पाहिजे असे सांगत रायसोनी इस्टीट्युटचा संपूर्ण परिसर देखील सौर उर्जेवर कार्यरत असल्याचे सांगितले. यानंतर रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी आपल्या मार्गदर्शनात परिषदेचे आयोजन व सहभागी होण्याचे महत्त्व विशद करत भारताने सामाजिक आणि आर्थिक विकासात समतोल साधणे आवश्यक आहे. कार्बनचे प्रमाण कमी करणे, पारंपारिक उर्जास्रोतांचा वापर कमी करावा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच आपल्याला उर्जा निर्मितीच्या क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि शाश्वत असे तंत्रज्ञान आणणे गरजेचे असून वैज्ञानिकांनी त्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत व भारताने सौर उर्जेला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. “शाश्वत विकासात पर्यावरण अभियांत्रिकीचे महत्व” या बाबत निगडीत अनेक बाबींवर चर्चा या परिषदेत करण्यात आल्या. प्राध्यापक, उद्योगजगतातील व्यक्ती तसेच संशोधक विद्यार्थी यांनी कॉन्फरन्ससाठी सादर केलेले रिसर्च पेपर्स आयएसबीएन क्रमांक असलेल्या नामांकित प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत. विविध राज्यांमधून जवळपास १०८ पेपर या राष्ट्रीय परिषदेत सादर झाले त्यातून ६५ पेपरची निवड यावेळी करण्यात आली होती या परिषदेत नामांकित शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी नेमाडे व प्रज्वल वाकलकर या विध्यार्थ्यानी केले तसेच आभार विद्युत अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. बिपासा पात्रा यांनी मानले. तसेच या परिषदेसाठी सिव्हील अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा.डॉ. शंतनू पवार, मॅकेनिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख मुकुंद पाटील व इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. तुषार पाटील यांनी सहकार्य केले तसेच सदर परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी यांनी कौतुक केले.