जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आता वादात सापडण्याची चिन्हे आहेत. संबंधच नसलेल्या जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचा मी थकबाकीदार कसा ? , या मुद्द्यावर नाना पाटलांनी संबंधीताना घेरले आहे, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी मंत्री एकनाथराव खडसे व निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांच्याविरोधात ते सोमवारी हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करणार आहेत .
जय मातादी नागरी सहकारी पतसंस्थेचे थकबाकीदार असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नाना पाटील यांचा मुक्ताईनगर तालुका सोसायटी मतदारसंघातील उमेदवारी अर्ज फेटाळला होता. दुसरीकडे या पतसंस्थेशी आपला काहीच संबंध नाही, आणि याच पतसंस्थेने दिलेले बे -बाकी प्रमाणपत्र आपल्याकडे आहे, असा दावा काल नाना पाटील यांनी केला होता. विशेष म्हणजे या मतदारसंघातून फक्त नाना पाटील आणि एकनाथराव खडसे या दोघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते नाना पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित समजली जात होती .
निवडणूक प्रक्रिया वेगात सुरु असल्याने नाना पाटील यांना कोणत्या पद्धतीने थकबाकीदार दाखवण्यात आले, याची सत्यता पडताळणी करण्यासाठी संबंधितांना वेळ नव्हता असे नाना पाटील यांना सांगण्यात आले होते. ते थकबाकीदार असल्याची कागदपत्रे खोटी आहेत हे खरे असले तरी नाना पाटील यांची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली नसल्याने नाना पाटील यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे , असे त्यांचे वकील अँड. धनंजय ठोके यांनी सांगितले . आता ही फौजदारी याचिका हायकोर्टात सोमवारी दाखल केली जाणार आहे . निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई आणि एकनाथराव खडसेंही आता कचाट्यात सापडले जाणार आहेत नाना पाटील यांना पाहिजे असलेली माहिती उपलब्ध होत नाही, असे सांगून सहाय्यक निबंधकांनीही जास्त माहिती देण्यास नकार दिला होता, त्यामुळे आता मुकाबला कोर्टातच होईल असे नाना पाटील यांनी सांगितले. माजी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख आणि स्वतः याचिकाकर्ते नाना पाटील हायकोर्टात ठाण मांडून बसलेले असल्याचे समजते.