मुंबई – राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १० हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४० घटना घडल्या. त्यात ८१९ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख १० हजार १४० गुन्हे नोंद झाले असून २० हजार ९११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ४९ लाख ४९ हजार १०४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो.लॉकडाऊन च्या काळात या १०० नंबरवर ९३ हजार ६०६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ३ लाख ६६ हजार १४६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती श्री.देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३ लाख ९७ हजार १३९ पास देण्यात आले आहेत.