जळगाव ( प्रतिनिधी ) – सुपर मार्केट , किराणा , मॉल्समधून वाईन विक्री खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने आर्थिक तिजोरी आणि असा सगळा विचार करून घेतला असेल , तो मान्य आहे , मात्र यावर आमच्याकडे कुणाच्याही तक्रारी आलेल्या नाहीत , महिलांच्या यावर तक्रारी आल्या तर त्यावर विचार नक्की करू , असे प्रतिपादन आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले .
राज्य महिला आयोगाने आयोजित केलेल्या जनसुनावणीसाठी जळगावात आलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माध्यमांशी बोलत होत्या . दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की , कोरोनाकाळात मोदी सरकारने महाराष्ट्राला काहीही आर्थिक किंवा वैद्यकीय सेवांबद्दल मदत केलेली नाही . महाराष्ट्राला मिळणारी अशी सापत्न वागणूक राज्याला माहिती आहे . महाराष्ट्र लढत राहिला आणि लढत राहील . मोदी देशाचे पंतप्रधान आहेत , फक्त त्यांच्या पक्षाचे नाहीत . काल त्यांनी संसदेत केलेले भाषण निवडणूक प्रचारसभेसारखे होते हे सगळे आपण अनुभवत आहोत.