जळगाव स्टेशनवरील यार्ड परिसरात घटना
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रेल्वे स्टेशन परिसरातील यार्ड परिसरात शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अनोळखी तरुण रेल्वे ट्रॅकवर झोपल्यामुळे त्यांचा रेल्वेखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव रेल्वे स्थानक येथील यार्ड जवळ सेवाग्राम एक्सप्रेसखाली आल्याने एका अनोळखी अंदाजे ३० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रेल्वे खंबा क्रमांक ४१९ जवळ घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरूणाच्या डोक्याला व कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मयताची ओळख पटवावी असे आवाहन रेल्वे पोलीसांनी केली आहे. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ एच.सी. चौधरी हे करीत आहे.