जळगाव शहरातील दशरथ नगर भागात घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील दशरथ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या एका रुग्णवाहिकेला रविवारी रात्री अचानक आग लागल्याची भीषण घटना घडली. या आगीत संपूर्ण रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.
ही घटना रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास का.ऊ. कोल्हे शाळेच्या मागील बाजूस असलेल्या दशरथ नगर रस्त्यावर घडली. मोकळ्या जागेत ही रुग्णवाहिका उभी असताना अचानक तिला आग लागली. आसपास असलेल्या कचरा आणि सुकलेल्या गवतामुळे या आगीने त्वरित पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण रुग्णवाहिका आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, तेथून जात असलेले मनपा विद्युत विभागातील कर्मचारी सुभाष अलाड यांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले, मात्र तोपर्यंत रुग्णवाहिका पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीमुळे रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले असून, मालक विशाल गुजराथी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने ही रुग्णवाहिका मोकळ्या जागेत उभी असल्यामुळे इतर कोणतीही मोठी हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु शॉर्ट सर्किट किंवा बाहेरील ज्वलनशील वस्तूमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.