नवीदिल्ली (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या लढ्यामध्ये रस्त्यावर येऊन आपला जीव धोक्यात घालून कोरोना बळींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा कोरोनानेच घात केला आहे. दिल्लीच्या सीलमपूर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे.
दिल्लीच्या सीलमपूर भागात राहणाऱ्या ‘आरिफ खान’ यांनी कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून 200 हून अधिक कोरोनाग्रस्तांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविले होते. तसेच 100 हून अधिक कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी पोहोचविले होते.
दरम्यान, आता कोरोनाने या कोरोना योद्ध्याचा बळी घेतला आहे. रुग्णवाहिका चालक आरिफ यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. आरिफ यांच्या निधनावर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘आरिफ हे गेल्या 25 वर्षांपासून शहीद भगत सिंह सेवा दलामध्ये सक्रीय होते, असे सांगितले जात आहे. तसेच ते मोफत रुग्णवाहिका सेवा देत होते. 21 मार्चपासून ते कोरोना लढ्यामध्ये रुग्णांना हॉस्पिटलला नेणे, आयसोलेशन सेंटरला पोहोचविणे आदी सेवा देत होते. अश्या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.