जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील बळीराम पेठेतील संत कंवरराम मार्केटमधील न्यू गोवर्धन कलेक्शन कापड दुकान फोडून दुकानातील १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सोमवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तींविरोधात शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजा दयालदास पारवाणी (वय-५४, रा. सिंधी कॉलनी, कंवर नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह राहायला आहे. त्यांचे जळगाव शहरातील बळीराम पेठेतील संत कंवरराम मार्केटमध्ये न्यू गोवर्धन कलेक्शन कापड नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रविवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून राजा पारवाणी हे घरी गेले. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कापड दुकानाचे शटर उचकावून दुकानातील गल्लाचे लॉक तोडून १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड चोरून नेण्याचे उघडकीला आले. सोमवारी १९ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे ९.३० वाजता एका चहा टपरीवाल्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने राजा पारवानी यांना फोन करून घटनेची माहिती दिली. पारवाणी हे त्वरीत त्यांच्या दुकानावर आले. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी करीत आहे.