जळगाव (प्रतिनिधी)- शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलामुळे येथील रहिवाश्यांना शहरात येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वेचा जिना रहिवाशांसाठी वापरण्यास उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने रेल्वे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शिवसेना महिला आघाडीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवाजी नगरमधील रहिवाशांना होणारा त्रास हा प्रचंड स्वरूपाचा असून ज्या दिवसापासून उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे त्या दिवसापासून शिवाजीनगर मधील नागरिकांना शहरात येण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरचा फेरा पडतोय त्यामुळे शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांना तहसील ऑफिस कडील भागातून अवैधरित्या रेल्वे रूळ ओलांडून प्रसंगी जीव धोक्यात टाकून शहरात यावे लागते. आपण रेल्वे प्रशासनातर्फे स्थानिक नागरिकांसाठी रेल्वेचा जिना वापरण्याची परवानगी दिलेली होती. मध्यंतरात लोकडाऊनमुळे रेल्वे प्रशासनातर्फे सदर ब्रिज बंद करण्यात आला होता. परंतु पूर्ण देश अनलॉक झाल्यानंतरही तो ब्रिज सुरू करण्यात आलेला नाही तरी आपण पुनश्च एकदा परवानगी द्यावी. रेल्वे स्टेशन मास्तर श्री अग्रवाल साहेब व आरपीएफ इन्स्पेक्टर पटेल साहेब यांना या निवेदनाद्वारे विनंतीवजा इशारा देण्यात येत आहे की सात दिवसाच्या आत रेल्वे जिना वापरण्याकरता सुरू करावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देण्यात येईल असे, माजी शिवाजीनगर शिवसेना विभागप्रमुख विजय राठोड यांच्यातर्फे कळविण्यात आले. सदर निवेदन देताना शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख ज्योती शिवदे, विशाल वाघ, समीर खाटीक, प्रवीण पगारे, इमरान शहा, योगिता शुक्ल, छाया कोरडे, गणेश महाजन, रमाकांत नायडू, पंकज राजपूत, जुबेदाबी शेख, हर्षल जोशी, राहुल विखे व शिवाजीनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते.