जळगाव शहरातील मेहरूण भागात घटना, रुग्णालयात मातेचा आक्रोश
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मेहरूण भागातील ममता हॉस्पिटलजवळ खेळत असलेल्या ६ वर्षीय बालिकेला अज्ञात रिक्षा चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत जबर धडक दिली. या धडकेत बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी १२ ते १ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मनीषा जयसिंग बारेला (वय ६, रा. नागलवाडी ता. चोपडा, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे मयत बालिकेचे नाव आहे. तिच्या पश्चात आई, मामा असा परिवार आहे. मनीषाची आई ही स्थानिक ठेकेदार अहमद खान यांच्याकडे बांधकाम व्यवसायावर हातमजुरी करून उदरनिर्वाह करीत होती. तर मनीषा ही इयत्ता पहिलीमध्ये मराठी शाळेत शिकत होती.(केसीएन)दरम्यान मंगळवारी नेहमीप्रमाणे ममता हॉस्पिटलजवळ बांधकाम व्यवसायाच्या कामावर मनिषाची आई ही काम करत होती. तर मनीषाही बाजूलाच खेळत होती. अचानक रस्त्याच्या बाजूला मनीषा गेली असता तेथे भरधाव रिक्षाने तिला समोरून धडक दिली. या धडकेत मनीषा बारेला हिच्या तोंडाला, पायाला जबर मार लागला.
यावेळेला ठेकेदार अहमद खान यांनी नागरिकांच्या मदतीने बालिकेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन) यावेळेला रुग्णालयात मातेचा मन हेलावणारा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले. दरम्यान, मनीषाचे वडील देवसिंग हे देखील पाच वर्षांपूर्वी एका बस अपघातात मयत झाले असल्याची माहिती मिळाली. घटनेबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान मयत कुटुंबीयांवर आलेल्या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.