भुसावळ तालुक्यातील वरणगाव ते वेल्हाळा दरम्यान घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील वेल्हाळा येथील रहिवासी गृहिणीची रिक्षामधून ४० हजारांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३ अज्ञात महिलांविरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ज्योती छगन पाटील (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. ज्योती पाटील या दि. २६ रोजी वेल्हाळा येथून वरणगावला मंगळवारच्या बाजारासाठी आल्या होत्या. बाजारपेठेत खरेदी करून दुपारी ३ वाजता वरणगावच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून त्यांनी ४० हजारांची रोकड काढली. त्यानंतर औषधे खरेदी करून वेल्हाळा जाण्यासाठी त्या वसंत सुरवाडे यांच्या रिक्षामध्ये बसल्या. रिक्षामध्ये त्यांच्या सोबत तीन महिला होत्या. ही रिक्षा थोडे अंतर जाताच त्या महिलांनी रिक्षाचालकाला बाजाराची पिशवी दुकानात राहिली असे सांगून त्या मराठा समाज मंदिराजवळ उतरून गेल्यात. त्यानंतर ज्योती पाटील घरी पोहोचल्यावर त्यांना त्यांच्या पर्समधून पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत रिक्षामधील त्या तीन महिलांवर संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी बाजार परिसर व बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तपास स.पो. नि. अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनात पो. कॉ. सुभाष सपकाळ करत आहेत.









