जळगाव ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोरील महामार्गावर खड्डा चुकवण्याच्या नांदात रिक्षाने दुचाकीवरील तरुणाला चिरडल्याची घटना २१ ऑक्टोबररोजी रात्री घडली.
प्रवीण रमेश पाटील (वय २७, रा. भवरखेडे, ता. धरणगाव) अपघातातील मृत तरुणाचे नाव असून तरुणाचे १० महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पाळधी पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद आहे.
प्रवीण पाटील मजुरी करून पोट भरायचा. ममुराबाद येथे कापसाचे वाहन भरल्यानंतर तो भवरखेडा गावी निघाला असता महामार्गावर विद्यापीठाच्या समोर पडलेला मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रिक्षाने प्रवीणच्या दुचाकीला कट मारला. त्यात धडक बसल्याने प्रवीण महामार्गावर पडला व त्याच्या डोक्याला जबर इजा झाली.
प्रचंड रक्तस्राव झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. या वेळी रिक्षात बसलेले काही प्रवासीही जखमी झाले. रिक्षात बसलेल्या एका महिलेने आपल्या बाळाला रस्त्याच्या कडेला फेकून त्याचे प्राण वाचवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रवीणवर भवरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.