जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनी रोडवर उभ्या असलेल्या दोन रिक्षाचे लोखंडी डिक्ससह चाके लांबवल्याची घटना सोमवारी रोजी सकाळी उघडकीला आली होती. या गुन्ह्यातील दोन आरोपींना मंगळवारी रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जोशी कॉलनी येथील प्रेम शरद बागुल यांनी रविवारी रात्री एमएच १९ सीडब्लु ३११५ या क्रमांकाची रिक्षा घरापासून काही अंतरावर असलेल्या कला भवनसमोर उभे केली होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा घेऊन जाण्यासाठी बागुल घराबाहेर पडले त्यांना रिक्षाचे मागील चाक लोखंडी डिस्कसह चोरट्यांनी लांबविले असल्याचे दिसून आले. दरम्यान बागुल यांच्या रिक्षाजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या एमएच १९ जे ७७८१ या क्रमांकाच्या रिक्षाचेही मागील बाजूचे चाक चोरून नेल्याचे समोर आले. प्रेम बागुल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोहेकॉ जयंत चौधरी, सुनिल दामोदरे, दिपक पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील यांनी रिक्षाचे चाक चोरीतील संशयित आरोपी आकाश अरूण जोशी (वय-२४ , रा. सिंगापूर कंजरवाडा ) आणि राहूल गणेश महाजन (वय-१९ , रा. टिपू सुलतान नगर तांबापूरा ) यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचे रिक्षाचे चाके हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.