जळगाव ( प्रतिनिधी ) – उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे, अशा सर्व रिक्षाचालकांना परवाना अटीप्रमाणे मीटरप्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक आहे. प्रत्येक परवानाधारक ऑटो रिक्षाला इलेक्ट्रॉनिक्स मीटर सुस्थितीत असणेदेखील बंधनकारक आहे, असे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांनी कळविले आहे.
एखाद्या प्रवाशाने मीटरप्रमाणे भाडे देवू असे म्हटल्यास रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे भाडे घेणे अनिवार्य आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे अनेक प्रवाशांनी तक्रार केली आहे. त्यानुसार रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे घेण्यास नकार देतात. ही बाब रिक्षा परवान्याचे उल्लंघन करणारी आहे.
सर्व ऑटोरिक्षा परवानाधारकांनी 8 नोव्हेंबरपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीटर अद्ययावत करुन मीटरप्रमाणे भाडे घ्यावे अन्यथा पालन न करणाऱ्या परवाना धारकाविरुद्ध परवाना निलबंनाची दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
जळगाव शहरात ऑटो रिक्षाचालक प्रवाशांकडून मीटरप्रमाणे भाडे आकारणी करीत नसतील, तर नागरिकांनी रिक्षाचालकाविरुद्ध उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2261819 किंवा mh19@mahatranscom.in या संकेतस्थळावर तक्रार करावी. संबंधित परवाना धारकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी म्हटले आहे.