अमळनेरच्या तहसीलदारांचे आदेश
अमळनेर (प्रतिनिधी) : शासकीय सेवेत असताना देखील केसरी कार्डवरील रेशनच्या धान्याचा लाभ घेतल्याप्रकरणी तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांनी एका कुटुंबाला १ लाख ३४ हजार ४८७ रुपयांचा भरणा १५ दिवसांच्या आत शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
सुखदेव धोंडू पाटील यांचे तिन्ही मुले प्रदीप सुखदेव पाटील, मेघा सुखदेव पाटील, संदीप सुखदेव पाटील हे तिन्ही शासकीय सेवेत आहेत. तरीदेखील २०१२ पासून शासन नियमानुसार स्वस्त धान्याचा लाभ घेत होते. त्यांच्यावर लोकसेवक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सुमित प्रदीप पाटील यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे केली होती. सुराणा यांनी याबाबत सखोल चौकशी केली.
सुनावणी दरम्यान सुखदेव पाटील यांनी तक्रारदार सुमित पाटील यांच्याशी कौटुंबिक वाद असल्याने ते तक्रार करीत असल्याचे म्हटले. यावर तहसीलदारांनी या कुटुंबाकडून घेतलेल्या गहू, तांदूळ च्या दराप्रमाणे २०१२ ते जुलै २०२४ पर्यंत ची एकूण रक्कम १ लाख २३ हजार ३८२ रुपये व त्यावर ९ टक्के व्याज दराने एकूण १ लाख ३४ हजार ४८७ रुपये चा भरणा तात्काळ १५ दिवसाच्या आत शासनाला चलनद्वारे करावा असे आदेश दिले आहेत.
तसेच जुन्या शिधापत्रिकेवरील लाभ बंद करून नव्याने पांढऱ्या शिधापत्रिकाचा प्रस्ताव पाठवण्यात यावा असेही आदेशात म्हटले आहे.