जळगाव शहरात कासमवाडी येथे शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) : काम आटोपून पाचोरा येथून जळगावला घरी येणाऱ्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील माहेजी गावानजीक घडली. तरुणाच्या मोबाईलवरून ओळख पटली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मोहसीन खान मन्सूरखान सिकलगर (वय ३७, रा. कासमवाडी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. (केसीएन)मोहसीन खान हे हातमजुरीचे काम करीत होते. मोहसीन खान हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना मदत करणारे मन्सूरखान सिकलगर यांचे चिरंजीव होते.ते गुरुवारी पाचोरा येथे कामासाठी गेले होते. तेथून ते रेल्वेने जळगाव येथे घरी परतत असताना माहेजी गावानजीक रेल्वेतून पडले. हा प्रकार दुसऱ्या रेल्वे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानक प्रमुखांना माहिती दिली. त्या वेळी पोलिस तेथे पोहचले.
तरुणाच्या खिशात रेल्वेचे तिकीट, मोबाईल व चार्जर सापडले. मोबाईलमध्ये डायल असलेल्या क्रमांकावर पोलिसांनी संपर्क साधला असता तो पाचोरा येथे ज्यांच्याकडे काम केले त्यांचा निघाला. त्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीच मयताच्या नातेवाईकांना याविषयी कळविले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला व शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी रुग्णालयात मोहसीन यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.